April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

बी.पी.एल. रेशनकार्ड धारकांना थकित विज बिलाचे १८ हप्‍ते पाडून १८ महिन्‍यात विज बिलाचा भरणा करण्‍याची सवलत द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

दारिद्रयरेषेखालील शिधापत्रीका धारकांना थकित विज बिलाचे १८ महिन्‍यांचे १८ हप्‍ते पाडून विज बिलाचा भरणा करण्‍याची सवलत देण्‍यात यावी तसेच नियमित विज बिल भरणा-यांना कोणतेही व्‍याज तसेच दंड आकारण्‍यात येवू नये अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

 

लॉकडाऊनच्‍या कालावधीतील थकित विजबिलापोटी गोरगरीब जनतेचे विज कनेक्‍शन कापण्‍यात येत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महावितरणचे मुख्‍य अभियंता श्री. देशपांडे यांच्‍यासह विश्रामगृह चंद्रपूर येथे बैठक घेतली. या बैठकीला महावितरणचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, रवि गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

 

यावेळी झालेल्‍या चर्चेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काही महत्‍वपूर्ण मुद्दयांवर चर्चा केली. केशरी शिधापत्रीका धारकांना १२ महिन्‍याचे १२ हप्‍ते पाडून विज बिल भरण्‍याची मुभा देण्‍यात यावी, विज कनेक्‍शन कापण्‍यापूर्वी १५ दिवसात २ वेळा नोटीस पाठविण्‍यात यावे, महावितरणच्‍या उपविभागीय कार्यालयामध्‍ये योजनेची माहिती देण्‍याकरिता कक्ष तयार करण्‍यात यावा, दिनांक १८ मार्च २०२१ पासून पूढील 10 दिवस विजबिल धारकांचे कनेक्‍शन कापू नये, पुढील 8 दिवस वृत्‍तपत्रांमध्‍ये योजनेची प्रेसनोट द्यावी, महावितरणच्‍या प्रत्‍येक उपविभागीय कार्यालयामध्‍ये योजनेच्‍या माहितीचे होर्डींग्‍ज लावण्‍यात यावे, ज्‍या जिल्‍हयांची वसुली ८० टक्‍क्‍यांच्‍या वर आहे तेथील विजबिल ग्राहकांचे विज कनेक्‍शनन्‍स कापू नये अशा सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्‍या.

 

चालु विज बिलासहीत जुने विज बिल पेंडींग आहेत त्‍यांनी एकंदर रकमेच्‍या ३० टक्‍के रक्‍कम भरून उरलेले विज बिल १२ महिन्‍यात समान हप्‍त्‍याने १ टक्‍का व्‍याजासह भरावे, असे स्‍पष्‍टीकरण महावितरणचे मुख्‍य अभियंता श्री. देशपांडे यांनी दिले. मागील काही दिवसात जिल्‍हयात ७००० ग्राहकांचे विज कनेक्‍शन कापण्‍यात आले असून जिल्‍हयाचे एकंदर वार्षी‍क विज बिल १३२४ कोटी होते. त्‍यापैकी ११७९ कोटी रू. वसुल झाले म्‍हणजेच ८९ टक्‍के थकबाकी वसुल झाल्‍याची माहीती महावितरणतर्फे देण्‍यात आली. जे ग्राहक १२ महिने नियमित विज बिल भरतील त्‍यांचे व्‍याज व दंड माफ होईल, विज कनेक्‍शन कापण्‍यासाठी १५ दिवस आधी ग्राहकांना नोटीस पाठविण्‍यात येते असेही महावितरण तर्फे सांगण्‍यात आले.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!