May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार – पप्पू देशमुख

डेरा आंदोलना’ ची मंत्रालय स्तरावर दखल.पालकमंत्र्यांची मागण्यासंदर्भात आंदोलकांशी चर्चा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील ५०० कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांचा थकीत पगार तसेच किमान वेतन देण्यात यावे या मागण्यासाठी मागील ८ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू आहे.कामगारांच्या डेरा आंदोलनाचा आठ दिवस पूर्ण झाले.दरम्यान आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या हिराई विश्रामगृह येथे जन विकास कामगार संघाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. शिष्टमंडळात जन विकास चे अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच इमदाद शेख, कांचन चिंचेकर,शेवंता भालेराव, ज्योती कांबळे,प्रफुल बजाईत,सुनिता रामटेके,अमिता वानखेडे इत्यादी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे सुद्धा उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे ५०० कोविड योध्द्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचे तसेच दोन कामगारांचा नाहक बळी गेल्याचे यावेळी देशमुख यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.वेतन जमा करणे तसेच नविन कंत्राटदाराची नियुक्ती करणे याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमनार यांनी नियमानुसार स्पष्ट लेखी सूचना देऊनही अधिष्ठाता कार्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागाने नियम डावलून निर्णय घेतल्यामुळे कामगारांचे पगार थकीत झाल्याचे सुद्धा यावेळी देशमुख यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.

 

ऊद्या मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांच्या कक्षात महत्वपूर्ण बैठक

 

डेरा आंदोलनातील कामगारांच्या मागण्यां संदर्भात उद्या १७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांच्या कक्षात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे.या बैठकीला चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

मृतक कामगारांचे पाल्य लक्षणीय उपोषणाला बसणार…..

Advertisements

थकीत पगाराने आलेल्या आर्थिक तणावामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रदीप खडसे तसेच संगीता पाटील या कामगारांचा मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याचा कामगारांचा आरोप आहे.संगीता पाटील यांच्या पतीचे सुध्दा निधन झाले होते. त्यामुळे आई-वडील दोघांच्या मृत्यूनंतर एकुलता एक मुलगा अनाथ झाला.डेरा आंदोलनातील कामगारांच्या समर्थनार्थ दुर्दैवी मृत्यू आलेल्या कामगारांची मुले अनिकेत पाटील (वय १६), प्रणल खडसे (वय१९) व मोनिका खडसे (वय २२) उद्या दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत डेरा आंदोलन स्थळी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

Advertisements
error: Content is protected !!