April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

बल्‍लारपूर शहरातील विकासकामांसाठी 5 कोटी रू. तर मुल शहरातील विकासकामांसाठी 3.50 कोटी रू. निधी मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

 

राज्‍याचे माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी 5 कोटी रू. तर मुल नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी 3.50 कोटी रू. निधी असा एकूण 8 कोटी 50 लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. नगर परिषदांना वैशिष्‍टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत सदर निधी मंजूर करण्‍यात आला आहे. नगरविकास विभागाने दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

 

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर व मुल शहरात याआधीही मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्‍वास आली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. बल्‍लारपूर शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती,  तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती कार्यालय इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्‍ज नाटयगृह, ऐतिहासिक राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन, अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे बसस्‍थानक, छटपुजा घाट आदी विकासकामे पूर्णत्‍वास आली आहेत. शहरानजिक अत्‍याधुनिक असे तालुका क्रिडा संकुल, सैनिकी शाळा साकारल्‍या असून बॉटनिकल गार्डन निर्माणाधीन आहे.

 

मुल शहरात आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार सांस्‍कृतीक सभागृह व स्‍मारक, प्रशासकीय इमारत, आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतीगृह, बस स्‍थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना, इको पार्क, आठवडी बाजार, श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, शहरातील मुख्‍य मार्गाचे सिमेंटीकरण, अंतर्गत रस्‍त्‍यांचे सिमेंटीकरण, पत्रकार भवनाचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, माळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम आदी विकासकामे मंजूर झाली असून यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.

 

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरातील विकासकामांसाठी 5 कोटी रू. निधी व मुल शहरासाठी 3.50 कोटी रू. निधी मंजूर झाल्‍यामुळे या शहराच्‍या विकासात मोलाची भर घातली जाणार आहे. विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर असलेली बल्‍लारपूर व मुल ही दोन्‍ही शहरे अधिक वेगाने विकसित होतील असा विश्‍वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!