April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

इरई नदीच्या लाल व निळया पुररेषादर्शक नकाशाला स्‍थगिती, दोषविरहीत पुररेषा निश्‍चीतीसाठी अभ्‍यास समिती गठीत

सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीनुसार आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

चंद्रपूर शहरातील इरई नदीच्‍या लाल व निळया पुररेषा दर्शक नकाशाला स्‍थगित देत महानगरपालिकेचे आयुक्‍त तसेच चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची समिती गठीत करून नव्‍याने दोषविरहीत नकाशा तयार करण्‍याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलाविलेल्‍या बैठकीत सदर निर्देश देण्‍यात आले.

दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली चंद्रपूर शहरातील इरई नदीच्‍या लाल व निळया पुररेषा दर्शक नकाशासंदर्भात बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर नकाशा हा सदोष असल्‍याने व त्‍या माध्‍यमातुन अतांत्रिकदृष्‍टया पुररेषा निश्‍चीत करण्‍यात आल्‍याने सदर पुररेषेवर पुनर्विचार करण्‍यात यावा व नव्‍याने दोषविरहीत पुररेषा निश्‍चीत करण्‍यात यावी, अशी  मागणी केली. चंद्रपूर शहरातील मौजा गोंविदपूर रिठ संपूर्ण, मौजा वडगांव, पठाणपुरा परिसराच्‍या बहुतांश क्षेत्रात विकास परवानगी नाकारण्‍यात येत आहे. कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांच्‍या दिनांक 6.9.2019 च्‍या पत्रान्‍वये प्राप्‍त नकाशानुसार चंद्रपूर शहरातील निळी पुररेषा बाधीत क्षेत्र हे 450 हे. आर आहे. चंद्रपूर शहर ते तीन बाजुने जंगलाने वेढलेले असल्‍याने शहराच्‍या विकासासाठी हेच क्षेत्र शिल्‍लक होते. आता या क्षेत्रातील विकास परवानग्‍या थांबविण्‍यात आल्‍यामुळे या क्षेत्रातील रहिवाश्‍यांमध्‍ये रोष निर्माण झालेला आहे. तसेच यामुळे महानगरपालिकेच्‍या उत्‍पन्‍नाट घट होऊन अनाधिकृत बांधकामे सुरू झालेली आहे. सदर पुररेषा निश्‍चीत करतांना पाटबंधारे विभागाने शहराच्‍या तसेच पुराच्‍या पाण्‍याचा प्रत्‍यक्षपणे कोणत्‍या जागेपर्यंत प्रादुर्भाव होतो याचा विचार न करता, अत्‍यंत अतांत्रिकदृष्‍टया पुररेषा निश्‍चीत केल्‍याचे मत बहुतांश नागरिकांनी व्‍यक्‍त केले आहे. त्‍याअनुषंगाने सदर पुररेषेवर पुनर्विचार करून पुररेषा रद्द करणे तसेच नव्‍याने पुररेषा निश्‍चीत करणे गरजेचे असल्‍याची भावना नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केलेला आहे. यासंबंधीचा अहवाल सदोष असून अहवालातील त्रुटी दूर करण्‍याच्‍या दृष्‍टीने तसेच लाल व निळया पुररेषादर्शक नकाशाला स्‍थगित देत आयुक्‍त मनपा, कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांची अभ्‍यास समिती गठीत करून प्रत्‍यक्ष नागरिकांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून दोषविरहीत नकाशा तयार करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याची भूमीका आ. मुनगंटीवार यांनी सदर बैठकीत मांडली.

याप्रकरणी लाल व निळी पुररेषादर्शक नकाशाला त्‍वरीत स्‍थगिती द्यावी व नव्‍याने दोषविरहीत पुररेषा निश्‍चीत करण्‍याच्‍या दृष्‍टीने मनपा आयुक्‍त व कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग यांची अभ्‍यास समिती गठीत करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधितांना दिले. बैठकीला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्‍त राजेश मोहीते, चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे आदींची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!