April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्‍हयातील पुरग्रस्‍त गावातील नुकसानाचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्‍यात आल्‍याने वैनगंगा नदीला आलेल्‍या पुरामुळे चंद्रपूर जिल्‍हयातील ब्रम्हपूरी, सावली, मुल या तालुक्‍यातील अनेक गावे पुरग्रस्‍त झाली आहे. यामुळे नागरिकांच्‍या घरांचे, शेतपिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे त्‍वरीत पंचनामे करून नागरिकांना, शेतक-यांना तातडीने मदत देण्‍यात यावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मुख्‍यमंत्री, महसुल मंत्री, मुख्‍य सचिव यांना पत्रे पाठविली आहेत.

गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्‍यात आल्‍याने आलेल्‍या पुरामुळे प्रामुख्‍याने ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील वैनगंगा नदीच्‍या काठावर असलेल्‍या अनेक गावांना फटका बसला आहे. लाडज, बेलगांव, कोलारी, भालेश्‍वर, अ-हेरनवरगांव, पिंपळगांव, चिखलगाव, रणमोचन, खरकाडा, बरडकिन्‍ही, चिचगांव, बेटाळा आदी गावांमध्‍ये पुराचे पाणी शिरले आहे. लाडज गावाला सर्वाधिक फटका बसला आहे. सावली आणि मुल तालुक्‍यातील काही गावांना सुध्‍दा पुराचा फटका बसला असून कोरंबी हे गांव पूर्णपणे पुराच्‍या पाण्‍याने वेढले आहे.  नागरिकांच्‍या घरातील साहित्‍याचे व शेतक-यांच्‍या शेतपिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्‍याचप्रमाणे पशुधनाचे सुध्‍दा मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून पुरग्रस्‍तांना त्‍वरीत मदत देण्‍याची आवश्‍यकता आहे. याबाबत राज्‍य शासनाने तसेच जिल्‍हा प्रशासनाने त्‍वरीत पावले उचलावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार, खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुल, जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष रेखा कारेकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य संजय गजपूरे आदींनी केली आहे.

Advertisements
error: Content is protected !!