April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

धक्कादायक घटना समोर आली आहे राम नगर पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक लाकडे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला दारू तस्करांनी केला

चंद्रपूर : दारुतस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून आरोपीला पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. यात रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार आहे. तर त्याचे दोन सहकारी आणि आईवडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना अमित गुप्ता नावाचा व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनातून दारुतस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यानुसार लाकडे हे एक पोलीस कर्मचारी आणि सहायक कर्मचाऱ्याला घेऊन डिस्पेन्सरी चौकात गेले. यावेळी अमित गुप्ताला याची भनक लागली आणि त्याने हे वाहन आपल्या घराकडे पळविले.

महाकाली चौक परिसरातील त्याच्या घरी पोलीस येऊन धडकले. वाहनाची तपासणी केली असता त्यात देशीदारूच्या चार पेट्या आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना लाकडे आणि आरोपी अमित गुप्ता यांच्यात झटापट झाली.

यावेळी आरोपीचे आईवडील आणि दोन सहकारी देखील आले. त्यांनी लाकडे यांना मारहाण केली. यात लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!