April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

कृष्ण नगर पाठोपाठ बिनबा गेट परिसरही 14 दिवस बंद

चंद्रपूर, दि.13 मे : चंद्रपूर शहरात आज दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. महानगर प्रशासनाने 9 मे रोजी यवतमाळ येथून आलेल्या 23 वर्षीय मुलीला होम कॉरेन्टाईन केले होते. 11 मे रोजी या मुलीचे स्वॅब घेण्यात आले. आज नमुना पॉझिटीव्ह आला. त्यामुळे यापुढे रेडझोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात यावेत ,असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन ,मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर एक व्हिडिओ संदेश विजय वडेट्टीवार यांनी जारी केला. यामध्ये त्यांनी जिल्हावासीयांना कोरोना आजाराला सहज न घेण्याचे आवाहन केले. अन्य राज्यातील, जिल्हयातील नागरिकांना जिल्ह्यात परत घेतांना त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्याचे निर्देश दिले.आत्तापर्यंत जिल्हा हा कोरोना मुक्त होता. 2 मे रोजी रात्रपाळी काम करणारा एक सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आढळला. मात्र त्याच्या कुटुंबातील कोणीही पॉझिटिव्ह नाही. तो राहत असलेला कृष्णनगर परिसर व सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या अपार्टमेंटमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.

सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांकडून धोका अधिक आहे.
मात्र, आज पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. मोठ्या संख्येने नागरिक रेडझोन व जोखमीच्या जिल्ह्यातून परतल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह वैद्यकीय व महसूल विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज त्यांनी बैठक घेतली.

Advertisements

त्यानंतर त्यांनी 13 मे रोजी रात्री 12 वाजता पासून 17 मे रोजी पर्यंत फक्त चंद्रपूर शहरात जमावबंदी लागू केली आहे. 4 मे पूर्वी असणारे लॉकडाऊन कायम राहील, असे स्पष्ट केले. त्यामुळे 14 मे पासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 2 खुली राहणार आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची सूची तयार होणे, त्यानंतर या परिसरातील संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी करणे, परिसराची संपूर्ण नाकाबंदी करणे, आरोग्य पथक प्रत्येक घराच्या तपासणीसाठी गठित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पोलीस विभागाने तात्काळ या परिसरात नाकाबंदी करावी असे निर्देशही त्यांनी दुपारी जाहीर केले.

रेड झोन मधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आता गृह अलगीकरण (होम कॉरेन्टाइन ) करून घरी राहण्याची परवानगी देऊ नये. त्यांना संस्थात्मक अलगीकरण करून त्यांची रवानगी रुग्णालयात करावी. तसेच त्या ठिकाणी त्यांची तपासणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या आणीबाणीच्या परिस्थितीत भावनिक न होता प्रशासनाच्या या निर्णयाला प्रतिसाद द्यावा. ज्यांना होम कॉरेन्टाइन यापूर्वी केलेले आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये. स्वतःच्या आरोग्यासोबतच कुटुंबाच्या व समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशमध्ये केले आहे.

दरम्यान,जिल्हा आरोग्य यंत्रणेने आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये यापूर्वीच्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. या रुग्णाच्या संपर्कातील 62 पैकी 60 नागरिक निगेटिव्ह आहेत. 2 नागरिकांचा अद्याप अहवाल अप्राप्त आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 293 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 पॉझिटिव्ह, 237 नागरिक निगेटिव्ह तर 54 नागरीकांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. जिल्ह्यात सध्या 291 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहे.
तर आतापर्यंत 57 हजार 3 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेतून गेले असून त्यापैकी 39 हजार 814 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले आहे. सध्या 17 हजार 189 नागरिकांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे.

Advertisements
error: Content is protected !!