April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

प्रत्येक गावात मोठ्याप्रमाणात निर्जंतुकीकरण बचत गटांमार्फत गावागावांमध्ये मास्क व साबणाचे वाटप

चंद्रपूर दि २१ एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती शेकडो गावांमध्ये कोरोना मुक्तीचा लढा ग्रामपातळीवर भक्कमपणे लढला जात आहे. गावात रेड झोन जिल्ह्यांमधून येण्यास निर्बंध टाकले आहे. मात्र चुकून आलेल्या नागरिकांना गावातील शाळांमध्ये निवासी ठेवले जात असून तपासणी केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. शहरांप्रमाणेच गावात देखील ग्राम दक्षता दल सक्रिय झाले असून सुरक्षा, तपासणी, मदत, निर्जंतुकीकरण व प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात आज जिल्ह्यातील शेकडो सरपंचाची व्हीडीओ संवाद साधला.
चंद्रपूर जिल्ह्यातील 1836 गावांमध्ये कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. त्यातही सीमावर्ती भागामध्ये तेलंगाना राज्य, नागपूर,यवतमाळ आदी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून कोणीही सिमांमध्ये येऊ न देणे, चुकून गावात आल्यास त्यांना कॉरेन्टाईन करणे, गावांमध्ये येणाऱ्यांची यादी तयार करणे, फवारणी करणे, ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करणे, गावात साबण वाटप करणे, हात धुण्याचे महत्त्व पटवून देणे, निर्जंतुकीकरण रसायणाचा गावात पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, गावांमधील असंघटीत मजुरांची माहिती घेणे, गावातील असंघटीत मजुरांसाठी धान्य उपलब्ध करणे,परराज्यातील व अन्य मजुरांची राहण्याची व्यवस्था करणे, जिल्हा व तालुका कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे ,अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू पुरवठादार यांची यादी प्रसिद्ध करणे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखणे, गावांमध्ये स्वच्छता करणे, आदी १७ घटकांची पूर्तता प्रत्येक गावाला करणे आवश्यक आहे.
याशिवाय आरोग्यविषयक सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. गावागावात उपलब्ध करून देण्यात आलेल्या मेगाफोन वरून कोरोना संदर्भात रोज नव्या सूचनांची दवंडी चंद्रपूरच्या गावागावांमध्ये दिल्या जात आहे.
याशिवाय जिल्ह्यातील 52 चेक पोस्टवर 24 तास आरोग्य पथक तैनात असून प्रत्येकाची तपासणी याठिकाणी केली जाते. पोलिसांकडून कोणालाच प्रवेश दिला जात नाही. परवानगी घेऊन गेलेल्यांची देखील तपासणी करूनच त्याला आतमध्ये सोडल्या जाते. तसेच प्रत्येक चेक पोस्टवर निर्जंतुकीकरण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बाहेरून मालवाहतूक वा अन्य शेतीच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आत मध्ये येऊन परत जाणाऱ्या वाहनांच्या चालकांना कोणाशीही संपर्क येणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहे.
गावातील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावातील बचत गट सक्रिय झाले असून मास्क सोबतच साबणाचेदेखील वाटप केले जात आहे.
याशिवाय निर्जंतुकीकरण प्रक्रिया, हात स्वच्छ धुणे, मास्क कसे वापरायचे, याबाबतचे देखील समुपदेशन केले जात आहे. गावागावातील शाळांमध्ये आवश्यकता पडल्यास बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कॉरेन्टाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी १४ दिवसांपर्यंत गरज पडल्यास कॉरेन्टाई केले जाते.
आज जिल्ह्यातील सर्व सरपंच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,मुख्य लेखाधिकारी अशोक मातकर यांनी संपर्क साधून सूचना केल्या. उद्या पुन्हा काही सरपंचांची संपर्क साधला जाणार आहे. गावागावातील आपले सरकार केंद्रांमधून सरपंचांनी व ग्रामपंचायत सचिवांनी हा संवाद केला.

Advertisements
error: Content is protected !!