April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

10 जिल्ह्यांमध्ये 20 तारखेनंतर महाराष्ट्रातील ग्रीन झोनमधील काय सुरू करता येईल याचा सरकार अंदाज घेत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : कोरोनानंतर आर्थिक आघाड्यांवर कसं पुढे जायचं यावर अर्थतज्ज्ञांची एक समिती तयार केली असून ती सरकारला सल्ला देणार आहे. महाराष्ट्रात 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाला प्रवेश करू दिला नाही. शेतकऱ्यांना कुणीही थांबवणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 20 तारखेनंतर काय काय सुरू करता येईल याचा सरकार अंदाज घेत आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचं लॉकडाऊन आज संपलं. आता 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर राज्यातलं लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. दररोज 6 ते 7 लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोव्हिढ योद्ध्यासाठी नाव देण्याचं आवाहन केल्यानंत 21 हजार लोकांनी नावं नोंदवलं अशी माहिती त्यांनी दिली. प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी लसीचा प्रयोग करण्याची परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती केंद्राला केली आहे. ती परवानगी मिळली तर प्रयोगाला सुरुवात होईल.

Advertisements

मुख्यमंत्री म्हणाले, आज कोरोनामुक्त झालेल्या दोन जणांशी बोललो. 6 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरवलं. त्याच्या आईशी मी बोललो. त्यानंतर 83 वर्षांच्या आजीबाईंशी मी बोलललो. कोरोनावर मात करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. ते कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सल्ला देणार आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढाई दिली आता विषाणूसोबत लढाई आहे. या लढाईत भीमसैनिकांचं योगदान आहे त्यांना धन्यवाद.

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

वांद्र्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. शहा यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणे ही काळजीचं कारण आहे. अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घ्या. अशा घटनांमुळे भारताची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.

या प्रकरणावर आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

काय झालं वांद्र्यात?

दरम्यान लॉाकडाऊनचा पहिला टप्पा आज संपणार होता. आज लॉकडाऊन संपेल या आशेने मुंबईमध्ये राहणारे हजारो परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी वांद्रे पश्चिम याठिकाणी स्थानकात आले होते. लॉकडाऊन वाढवल्यामुळे या मजुरांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे मजुरांनी कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

या ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ झाला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन सर्वजण करत असताना एवढी गर्दी एका ठिकणी होणं हे मुंबईसमोर मोठं संकट ठरू शकते.

Advertisements
error: Content is protected !!