
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवून 30 एप्रिलपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे याचा शालेय पाठ्यपुस्तक वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक वितरण मंडळाने ऑनलाईन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे राज्यातील कन्नड, इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, तमिळ आणि तेलगू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.
दरवर्षी सरकारी व अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.
तर इंग्रजीसह इतर माध्यमाच्या विनाअनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. शाळा सुरू झाल्यानंतर साधारणपणे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्रास प्रिटींग प्रेस बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कामगारही येत नसल्याने पाठ्यपुस्तक छपाईवर परिणाम झाला आहे. दरवर्षी शिक्षण खात्याकडून निविदा प्रक्रिया राबवून पाठ्यपुस्तकांची छपाई करून घेतली जाते. यावेळीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असली, तरी प्रिटींग वेळेत होण्यास अडचण येणार आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके ऑनलाईनद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
वाचा – कुडचीत शंभर टक्के लाॅक डाऊन ; ड्रोन कॅमेऱ्याची अशी ही नजर…
केटीबीएसच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर इयत्ता, आपले माध्यम त्यानंतर कोणत्या विषयाचे पुस्तक हवे याची माहिती अपलोड करावी लागेल. त्यानंतर काही वेळातच पीडीएफ स्वरुपात पुस्तक उपलब्ध होणार आहे. तिथे “फुल्ल टेक्टबुक डाऊनलोड’ असे क्लिक केल्यास पूर्ण पुस्तक घरबसल्या उपलब्ध होणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरणास विलंब होण्याची शक्यता गृहीत धरून शिक्षण खात्याने ऑनलाईन पुस्तक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
शिक्षण खात्याचे आवाहन
www.ktbs.kar.nic.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी पुस्तके डाऊनलोड करून घ्यावीत. तसेच त्याप्रमाणे अभ्यासाला सुरवात करावी, असे आवाहन शिक्षण खात्यातर्फे करण्यात आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनीही ऑनलाईन पुस्तकांचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होईल, असे मत व्यक्त केले आहे.
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे