April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

नागपूर विद्यापीठ; ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा नाहीच

सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतरच परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूंनी मांडली.

नागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यभरातील सर्वच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता यासंदर्भात काय करावे याबाबत सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतरच परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूंनी मांडली. यासंदर्भात चार कुलगुरूंची समिती तयार केली असून परीक्षांचे नियोजन कसे करावे याबाबत ही समिती अहवाल देणार आहे.
नागपूर विद्यापीठसह सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन’ उठल्यावर तातडीने परीक्षा घेणे शक्य होणार नाही. परीक्षेची तयारी, नवीन वेळापत्रक, अगोदरच्या परीक्षांचे वेळापत्रक, मूल्यांकन यासह विविध गोष्टींचे नियोजन करावे लागणार आहे. जर १४ एप्रिलनंतर आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यात हे सर्व करण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड गोंधळ होऊ शकतो. शिवाय बहुतांश विद्यापीठांत कर्मचारी व अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अशा स्थितीत हे करणे जिकीराचे काम होईल. त्यामुळे जर १४ एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन’ उठला तर १५ मेच्या आसपास परीक्षा घेता येतील, अशी भूमिका नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मांडली. नागपूर विद्यापीठाकडून परीक्षा कशा घ्यावा यासंदर्भात तीन वेगवेगळ््या पर्यायांवर विचार सुरू आहे. या पर्यायांची योजना सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
राज्यपालांनी सर्व कुलगुरूंची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर ‘लॉकडाऊन’चा कालावधी कधी संपेल व त्यानंतर संबंधित समितीच्या अहवाल यांच्यावर बरेच काही विसंबून असेल असे स्पष्ट केले. या समितीत ‘एसएनडीटी’, मुंबई, पुणे व कोल्हापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश आहे.

Advertisements
error: Content is protected !!