April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूरात डॉ. पालिवाल यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या चमूने यासाठीचे एक अद्यावत यंत्र तयार केले

चंद्रपूर : देशात कोरोनाने थैमान माजविले असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. विशेष करून रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्णांना याचा सर्वात मोठा धोका आहे. यापासून सुरक्षा करण्यासाठी काही प्रयोगात्मक उपाय करण्यात येत आहे. मात्र, चंद्रपूरात डॉ. पालिवाल यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या चमूने यासाठीचे एक अद्यावत यंत्र तयार केले आहे. स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारीत हे यंत्र त्यातून जाणाऱ्या व्यक्तीला तीन थरात निर्जंतुक करते. त्यामुळे या यंत्रातून जाणार व्यक्ती हा संपूर्णतः निर्जंतुक होतो. विशेष म्हणजे अशाप्रकारचे यंत्र देशात पहिल्यांदाच तयार करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रुग्णालयात येणार प्रत्येक व्यक्ती हा पूर्णपणे निर्जंतुक केला जावा या उद्देशाने डॉ. पालिवाल यांच्या चमूने प्रयत्न सुरू केले. त्यांच्या सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ज्ञान असलेले संतोष जाधव, सागर शिगोडे, अतुल पहाडे यांनी मोठी मदत केली. अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी तीन थरांचे निर्जंतुकीकरण करणारे यंत्र तयार केले. याच्या पहिल्या थरात अतिनील किरणे बाहेर पडतात ज्यामुळे पृष्ठभागावर असलेले सर्व जंतू मरून जातात. दुसऱ्या थरात गरम हवेचा मारा होतो तर तिसऱ्या थरात सॅनिटाइझरचा फवारा उडतो. त्यामुळे बाहेर जाणारा व्यक्ती पूर्णपणे निर्जंतुक होतो. एकाच वेळी तिन्ही थरात निर्जंतुक करणारे हे पहिलेच यंत्र असा दावा या निर्मात्याकडून करण्यात आला आहे. हे यंत्र आणि त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी भेट दिली. ते स्वतः डॉक्टर असल्याने या सर्व तांत्रिक बाबी त्यांनी बारकाईने जाणून घेतल्या. तसेच लवकरच हे यंत्र जिल्हा सामान्य रुग्णालयात लावण्यात येण्याचेही त्यांनी सांगितले. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशाला मोठी मदत होणार आहे.

Advertisements
error: Content is protected !!