April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

कोरोना व्‍हायरस संदर्भात जनजागरणाची मोहीम जिल्‍हा परिषदेने तातडीने हाती घ्‍यावी – आ. सुधीर मुनगंटीवार

सीएसआर च्‍या माध्‍यमातुन सॅनिटायझर उपलब्‍ध करणार

आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हा परिषदेत घेतली आढावा बैठक

कोरोना व्‍हायरस चा वाढता प्रादुर्भात लक्षात घेता नागरिकांनी आपली काळजी घेणे अत्‍यंत गरजेचे आहे. यादृष्‍टीने जनजागरण करण्‍याची विशेष आवश्‍यकता आहे. ही आवश्‍यकता लक्षात घेता जनजागरणासाठी आपण आमदार निधीतुन निधी उपलब्‍ध करून देणार असून जिल्‍हा परिषदेने सुध्‍दा जिल्‍हयातील ग्रामीण भागात फ्लेक्‍स बोर्ड, जाहीराती आदींच्‍या माध्‍यमातुन जनजागरण अभियान राबविण्‍याचे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 16 मार्च रोजी चंद्रपूर जिल्‍हा परिषदेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना व्‍हायरस च्‍या वाढत्‍या प्रादुर्भावासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, वनविकास महामंडळाचे माजी अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार संजय धोटे, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष देवराव भोंगळे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. काळे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. गहलोत आदींची प्रामुख्‍याने उपस्‍थीती होती. कोरोना व्‍हायरस च्‍या वाढत्‍या प्रादुर्भावासंदर्भात करावयाच्‍या उपाययोजनांसंदर्भात त्‍यांनी आढावा घेतला. प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये सॅनिटायझर च्‍या बॉटल्‍स चा असलेला तुटवडा लक्षात घेता 500 ml  च्‍या 500 बॉटल्‍स आपण उपलब्‍ध करून देत असल्‍याचे आ. मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, देशाचे पंतप्रधान आणि राज्‍याचे मुख्‍यमंत्री यांनी कोरोना संदर्भात जनतेला आवाहनात्‍मक संदेश दिला आहे. ग्रामीण भागात जनजागरण करण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. नागरिकांनी सुध्‍दा याबाबत अफवा पसरवू नये, कोणत्‍याही गोष्‍टीचा बाऊ करू नये मात्र आरोग्‍याची काळजी निश्‍चीतपणे घ्‍यावी, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. जिल्‍हयातील जिल्‍हा परिषद क्षेत्र निहाय, पंचायत समिती क्षेत्र निहाय, ग्राम पंचायत निहाय दर्शनी भागात फलक लावणे, पत्रके वाटणे, पथनाटयाचे कार्यक्रम करणे असा स्‍वतंत्र आराखडा तयार करण्‍याची आवश्‍यकता आहे. सीएसआर च्‍या माध्‍यमातुन सॅनिटायझर आपण उपलब्‍ध करणार असून अफवांचे पेव फुटू नये याकडे विशेष लक्ष्‍य देण्‍याची आवश्‍यकता आहे. खोकला, सर्दी झाली तर नेमका उपचार कसा व कुठे घ्‍यायचा याबाबत विशेष निर्देश जिल्‍हा परिषदेने नागरिकांना द्यावे तसेच नमस्‍कार करणे, हात न मिळविणे, साबणाने ने हात धुणे आदी याबाबत सुध्‍दा जनजागरणाच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना जागृत करण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी प्रतिपादीत केली.

31 मार्च 2020 पर्यंत आपण स्‍वतः कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करणार नसून माझ्या मतदार संघात मी स्‍वतंत्र रथ फिरवून त्‍या माध्‍यमातुन जनजागरणाचे काम हाती घेणार आहे. यासंदर्भात डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एक समिती गठीत केली असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

Advertisements
error: Content is protected !!